Thursday, 17 July 2014

तहानेलं पाणी...

     आटपाट नगर होतं... तिथं रहायचं पाणी... हो खरंच... अगदी नानांनी म्हणलेल्या कवितेमधलंच पाणी..."आसमान से आनेवाली ,बुन्दोमे गानेवाली बारिश होऊन ,पहाडोसे फ़िसलनेवाला,नदियोंमे चलने वाला,नहरोंमें मचलनेवाला प्रवाह होऊन... कुंवेपोखर से मिलनेवाली ,खपरेलोंपर गिरनेवाली, गलियोंसे गुजरनेवाली सर होऊन.... " कित्ती कित्ती आनंद द्यायचं पाणी.. आणि स्वत:सुद्धा अगदी खळखळून हसायचं,खुशीत बागडायचं पाणी... अवघ्या नगराचं इतकं लाडकं की जीव की प्राण होतं साऱ्यांचं पाणी.

पण निर्मोही वाटायचं ते... का कुणास ठाऊक पण त्याचा जीव कुठे अडकला असेल असं वाटायचंच नाही...जणू कृष्णचंच रूप दुसरं... सगळ्यांसोबत असूनही कशाकशात न अडकणारं... सगळ्यांना वेड लावून स्वत: नामानिराळं होणारं...  अशी कित्येक वर्षं सरली...

     आणि खरंच त्याने अगदी दाखवूनच दिलं निर्मोहीपण त्याचं... सगळ्या नगराचा एवढा जीव पाण्यावर पण हे हरवलं ते हरवलंच...कुठे कुठे म्हणून नाही शोधलं त्याला अगदी सरकारी कचेरीत तक्रारही केली... पण कुठे दडी मारलीन् देव जाणे यानी...नगराला अगदी सुतक लागलं जणू... चैतन्य उरलंच नाही अगदी... सगळ्यांच्या डोळ्यातले पूरही आटले तरी पत्ता नाही तो नाहीच याचा... किती काळ लोटला कुणास ठाऊक ... नगर आजही वाट पहातंच होत... आणि अचानक....

     बातमी येऊन थडकली...नगरापासून १०० मैलांवरच्या समुद्रातून अचानक त्सुनामी नाव धारण करून बाहेर आलं ते... सगळा किनारा ध्वस्त करून परत निघून गेलं.... दोनच दिवसात नवी खबर.... "हाय टाईड" असं विलायती नाव घेऊन आणखी एक किनारा गिळून गेलं पाणी... मग थोड्याच दिवसात.... महापूर बनून...मग ढगफुटी होऊन... सतत नवी पाशवी रूपं घेत छळत रहायलं पाणी...

आणि इकडे नगरातल्या लोकांना काही म्हणता काही उमजत नव्हतं... असं का बदललं पाणी... आनंदाचे झरे होऊन सुखावणारं आपलं पाणी दु:खाचे लोट बनून कसं वहायला लागलं... याच नगरात एक मुलगी रहायची...मॅडी... तिचं या पाण्यावर अपार प्रेम होतं ... तिच्या मनाची एक खोली खास पाण्यासाठी राखीव होती... तिथे कुण्णाकुणाला म्हणून प्रवेश नव्हता... हे सगळं ऐकून तिच्या काळजाचंही पाणी झालं... ती रागावली होती की दु:खी होती कुणास ठाऊक... पण पाण्याच्या परतण्याची वाट मात्र नक्की बघत होती....

मग एक दिवस शेवटी ते दबलेल्या पायाने आलंच नगरात परत... मॅडीला वेशीवरच पाहून थोडं चक्रावलं पण काहीच क्षण... मग दोघांनी घट्ट मिठी मारली... मग काय झालं देव जाणे... मॅडी उसळून बरसलीच... "असलं कसलं जीवघेणं वागणं तुझं? इथे लोक तुझी वाट पाहून शिणले... आणि तू गावंच्या गावं गिळत बसलास... कसली तहान लागली तुला एवढी की जगाचा जीव घेऊनच शांत व्हावी... मैतर ना तू आमचा... आमच्याच भाऊबंदांच्या जीवावर ऊठलास... आमची तहान पाण्याची... तुझी रक्ताची कशी झाली ? दोस्त तरी कसं म्हणायचं रे तुला? ही अशी तहान आली कुठून तुझ्या काळजात राजा? अर्थात तुला काय कळायची नाती गोती आणि माया..."

पाण्यानं सगळं ऐकून घेतलं आणि थंड आवाजात उत्तरलं ," तुझ्या भाऊबंदांचा जीव गेला तर जन्माची मैत्री विसरलीस? लगेच तुझ्या-माझ्याचा हिशोब घेऊन बसलीस... मी नव्हतोच का कधी तुमचा... तुमच्यासाठी जगलोच नाही का कधी...पण तुम्हाला माझी खरंच काळजी होती कधी? माझी जीवाभावाची जंगलं जाळत राहिलात तेव्हा कुठे गेलं प्रेम? माझी घरं बुजवत राहिलात... कधी नद्यांमधे गाळ सोडून ... कधी समुद्रात सिमेंटच्या राशीच्या राशी ऒतून ... कुठे कुठे म्हणून खणत राहिलात... डोंगरच्या डोंगर पठार होत गेले तरी मी शांतच राहिलो...आज कळेल उद्या कळेल म्हणून तुमच्या लक्ष देण्याची वाट बघत राहिलो... आम्ही सगळे सगळे तुमचेच होतो गं, तुमचेच आहोत... पण आहोत तर सगळे आहोत... नाहीतर ... झाडं , चांदणं,वारा,मी, ... कोण कुणाला विसरलं लाडके?... आम्हाला हवेच आहात तुम्ही... तुम्ही धावत सुटलात... आमची अस्तित्वं संपवणारे लुटारू होत गेलात... तुमची अजस्त्र झाली भूक आणि माझं घर मिळत नाही म्हणून कुठे कुठे भटकलो मी... किनाऱ्यांवर,रस्त्यांवर... तर माझी तहान पाशवी वाटायला लागली? तसा आलोच आहे मी परत नगराच्या प्रेमाखातर... माझं तेवढं घर परत शोधायला मदत करशील तर वेळच यायची नाही कुठे जायची.... बघ जमतंय का? "

पाणी आलंच नगरात परत.... पण मॅडी अजूनही वेशीवरच आहे... मिठीत आलेलं पाणी डोळ्यात साठवून... कुणास ठाऊक...परत इतकी गाढ मिठी मिळेल न मिळेल.....

image courtesy : Internet.