बरेच दिवस गाजत असलेल्या "ब्रेकिंग न्यूज"वर शेवटी आज पडदा पडला... इतके दिवस ताणल्या गेलेल्या भुवयांनाही .... "काय तरी बाई ऐकावं ते नवलच्... हल्ली कुणाचं काई सांगता येत नाही ... डोंगर पोखरून उंदीरच हो पंत.... " या आणि तत्सम् प्रतिक्रियांनंतर जरा आराम मिळाला..... आणि तिचं काय झालं ... ते काही का होईना... पण महिना १५ दिवस श्टोरी मात्र बेस मिळाली हे तेवढं खरं... तंबाखू , बिडी च्या आवर्तनांपेक्षाही अंमळ जास्तच झाली म्हणायची दिवसागणिक घरी-दारी चर्चा....रिपोर्ट आले आणि एका मोठ्या होस्पिटलमधलं वातावरण ढवळून निघालं. आजतागायत कधीही न बघितलेली गोष्ट सगळे डॉक्टर बघत होते. गेल्या शेकडो वर्षांच्या वैद्यकीय नोंदी तपासून झाल्या तरी काही म्हणता काही कळेना. शेवटी हा रिपोर्ट जगभरातल्या नामी वैद्य, डॉक्टर, रिसर्च एक्स्पर्टस् अशा सर्वांनाच पाठवण्यात आला आणि लवकरात लवकर काही उपाय कळवावा अशी विनंतीपर पत्रही गेली.पैसा आणि प्रसिद्धी यापेक्षाही आजवरच्या ज्ञानाला मिळालेलं आव्हान म्हणून जगभरातले मेंदू त्या एका कागदाच्या तुकड्याकडे बघू लागले. आणि त्रिखंडामधल्या "मिडिया"नामक राक्षसीची भूक भागवणारी "ब्रेकिंग न्यूज" झळकली... काय असेल तिच्या रक्तात.... आजतागायत् कधीही न दिसलेल्या या घटकाचं नाव तरी काय... काय म्हणतात डॉक्टर!!! " वगैरे वगैरे वगैरे....
हो, आजवर कधीही न आढळलेला असा अनामिक घटक तिच्या रक्तात दिसला होता. आणि गेला महिना दीड महिना तिची स्वत:शीच् चाललेली झुंज स्वत:शी नसून या अनामिक घटकाशी आहे हे नव्यानं तिला जाणवलं... ज्याला नाव नाही, गाव नाही, रूप नाही,आकार नाही, उगम नाही , अंत असेल की नाही माहीत नाही... अशा अज्ञाताशी तिची आणि तमाम वैद्यकीय शास्त्राची लढत होती. ४ दिवसाच्या अथक अभ्यासांतीही जेव्हा काहीच निष्पन्न होईना तेव्हा एक शेवटचा उपाय म्हणून डॉक्टरांनी संपूर्ण रक्त बदलण्याचा निर्णय घेतला... "डायलिसिस्" ची तयारी झाली... इकडे "मिडिया" नावाच्या त्या सुकुमार दिसणाऱ्या मायावीनी ने तिच्यासाठी शुभेच्छांचे SMS मग ती जगेल की नाही यावरची Votes यावर आपली क्षुधा शमवायला सुरुवात केलीच होती.
टप्प्याटप्प्यानं सगळं रक्त बदललं गेलं, थेंबन थेंब नवीन असलेलं तरीही थकून गेलेलं ते शरीर परत एकदा रक्ततपासणीसाठी सिद्ध झालं. दोनच दिवसात परत एकदा आणखी एक कागदाचा तुकडा जगासमोर आला आणि "ब्रेकिंग न्यूज" आता "निराशाजनक बातमी" म्हणून झळकली. डबल फिल्टर्ड, ट्रिपल फिल्टर्ड वगैरे तेल आणावं आणि तरी किटली उघडल्यावर कुजकाच वास यावा तसा तो घटक अख्खं रक्त बदललं तरी तिथेच ठाण मांडून बसून राहिला होता...
दिवसागणिक एकिकडे मनातला थकवा आणि निराशा वाढत होती तर दुसरीकडे मसालेदार बातम्यांचं भरीत प्रेक्षकांच्या, वाचकांच्या नि श्रोत्यांच्या सेवेसाठी तयार होत होतं.आणखी एक प्रयत्न म्हणून परत एकदा रक्त बदलावं की काय असा विचार चालू असतानाच, तिच्या नावे एक निनावी पत्र आलं. पत्र तसं खाजगी खरं पण तिच्या अस्तित्वावर रंगलेल्या चर्चेइतकंच सार्वजनिक ते क्षणाचीही उसंत न घेता झालं.पत्र अगदी नेमकं .....
"बाळ, तुला जे झालंय त्याचा उपाय कोणत्याच वैद्याकडे तुला मिळायचा नाही. जो घटक आज तुझ्या रक्तात दिसतोय तो माझ्या रक्तात दिसला त्याला काही वर्षं लोटली. हा घटक मानवी रक्तात असतोच, फक्त मजा अशी आहे की वटवाघळांचा आवाज जसा कानाच्या पडद्यावर आपटूनही आपण ऐकू शकत नाही तसंच या घटकाचं अस्तित्वं...इतकं दीर्घ की आपल्याला सहसा ते जाणवत नाही... एक विषाणू आहे तो जर चुकून शरीरात भिनला तर मात्र हे दीर्घ असणं विरायला लागतं ...आणि मग तो रक्तात असा दिसून यायला लागतो. हा विषाणू भारतीय उपखंडात पाचएकशे वर्षापूर्वी खूप होता...आता सापडत नाही फारसा; पण तू आणि मी त्याला आकर्षित करणारे लाखांतले एखादे... या विषाणूचं नाव प्रत्येकासाठी वेगळं ... मुक्ताईला भिडला विट्टल म्हणून आणि मीरेला ग्रासलं कृष्ण होऊन... मला ज्या नावानं ग्रासलं ते सांगितलं तर तुझ्याभोवती फिरणारे सगळे "कॅमेरे" माझ्याभोवती घिरट्या घालतील , फ़क्त म्हणून त्याचा उल्लेख टाळतो.. तर असा हा विषाणू... आणि जो घटक तुला दिसतोय, त्याचं नाव "अहं" किंवा "मी" पणा....तुझ्यातला "मी" ह्रस्व झालाय पोरी... तुझ्यातला "मी" आता "मि" झालाय.... याला संपवण्याचा उपाय एकच, तुला ग्रासलेल्या विषाणूचं नाव लवकरात लवकर शोध. एकदा का त्याला शोधलं आणि त्याला बिनशर्त शरण गेलं की हा उरलासुरला "मि" त्यात विरघळून जाईल... तुला परत तुझं शरीर होतं तसं मिळेल... किंबहुना याही पेक्षा कित्येक पटीनं उत्कृष्ट.... तुही, तुझं अस्तित्वंही.... तेवढं नाव मात्र लवकर दे त्या तुझ्या विषाणूला... नाहीतर नाहक मरशील... शुभम!!!"
कालच हे पत्र सगळ्या जगाला ऐकायला मिळालं... कुणाच्या तरी वेदनेवर उपाय मिळण्याची शक्यता निर्माण झाली म्हणल्यावर त्यात काही मसालेदार उरलं नाही... तिचा शोध पूर्ण होईल किंवा नाही.. ती बरी होईल किंवा होणार नाही...द्यायची आहे कुणाला तिची साथ... तर आता चघळून बेचव झालेलं हे च्युविंगम... तसंही इतके दिवसात राजकारण, बलात्कार,खून, भ्रष्टाचार, त्यावरचे कायदे, पेज ३ वरची गोसिप्स या सगळ्या सगळ्यांमधल्या कित्ती तरी गोष्टी आसुसल्या आहेतच "ब्रेकिंग न्यूज" चं बिरूद मिरवायला... तिचं काय होईल....ते काही का होईना...पण महिना १५ दिवस श्टोरी मात्र बेस मिळाली हे तेवढं खरं...नव्यानं उंचावल्या जाण्यासाठी...इतके दिवस ताणल्या गेलेल्या भुवयांना जरा आराम मिळाला.....बरेच दिवस गाजत असलेल्या "ब्रेकिंग न्यूज"वर शेवटी आज पडदा पडला...
image courtesy : Internet
