पसायदान.... प्रत्येक ओवीवर आयुष्यभर अभ्यास होऊ शकेल इतकं ज्या निर्मितीमधे सामावलं आहे असं अद्भुत सृजन... पसायदानाबद्दल काही बोलावं ,लिहावं हा माझा अधिकार नाही, परंतु जे या अमृतापासून वंचित आहेत त्यांना मला झेपली तेवढी...थोडी गोडी चाखता यावी म्हणून हा अट्टाहास...
आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावेतोषोनी मज द्यावे, पसायदान हे ॥१॥
ज्ञानेश्वरीचं लिखाण पूर्णत्वाला जाता जाता माउलींनी देवाकडे हा वर मागितला आहे. ते म्हणतात,"विश्वाला व्यापून उरणाऱ्या परमेश्वरा, मी जो हा ९००० ओव्यांचा, शब्दांचा यज्ञ तुला अर्पण केला आहे त्यानं तू प्रसन्न व्हावंस आणि प्रसन्न होऊन मला मी मागत असलेल्या प्रसादचं दान द्यावंस."
जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो
भूतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे॥२॥
भगवंतापेक्षा भक्त कसा सहज मोठा होऊन जातो याचं ही ओवी प्रमाण आहे. एकदा, हनुमंत प्रभू रामचद्रांना म्हणाले,"भगवंता, तुमच्यापेक्षा माझी तुमच्यावरची भक्ती महान आहे." भगवंत म्हणले,"कसं ते ही सांग." यावर हनुमंत हसून उत्तरले," तुम्हांला समुद्र पार करता यावा म्हणून मला सेतू बांधावा लागला, पण मी फक्त तुमचं नाव मनापासून उच्चारलं आणि तोच सागर विनासायास लंघून गेलो. मग माझी भक्तीच श्रेष्ठ नव्हे का!" देवापेक्षा भक्ताची उंची अधिक व्हावी याचं हे एक उदहरण आणि माऊली दुसरं...
गीता सांगताना भगवंत स्वतः म्हणतात, " परित्राणाय साधूनाम्,विनाशायच दुष्कृताम्,धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे" म्हणजे... सज्जनांच्या रक्षणासाठी आणि दुष्टांच्या विनाशासाठी मी प्रत्येक युगात अवतरतो...असं भगवंत अर्जुनाला म्हणतात...आणि माऊली याच भगवन्ताला मागणं मागतात की हे भगवंता, जे खल आहेत, दुष्ट आहेत , दुर्जन आहेत त्यांची व्यंकटी म्हणजे दुष्टावा, वक्रता, वाईटपणा फक्त गळून पडो...आणि त्यांची चांगल्या कामांमधली आवड वाढत राहो. इथे देखील माऊलींच्या विश्वासाची उंची लक्षात येते. ते आवड वाढत राहो म्हणतात तेव्हा मुळात चांगुलपणाची मूलत: प्रत्येकाला आवड असते हा दृढ विश्वास नकळतपणे त्यांच्या विचरांमधून व्यक्त होतो. तर प्राणिमात्रांचा दुष्टावा संपून, त्यांची सत्कर्मातली रुची वाढत जावो आणि त्यायोगे सर्व जगात लोकांचे सात्विक संबंध असोत, एकमेकांशी शुद्ध मैत्र, सोदार्ह जुळो असं मागणं ज्ञानोबामाऊली ईश्वराकडे मागत आहेत.
पवित्र्याचं आणखी एक प्रमाण देखील याच ओवीमधे मिळतं. माऊली सर्वांत प्रथम त्या लोकांसाठी दान मागतात ज्यांनी काहीतरी वाईट कृत्य केलं आहे; कदाचित त्या लोकांसाठी ज्यांनी माऊली आणि त्यांच्या परिवाराला वाळीत टाकलं होतं.
दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात॥३॥
प्रार्थनेत पुढे ते म्हणतात,"वाईटाचा अंधार नष्ट व्हावा, आणि हे सर्व जग स्वधर्माच्या तेजाने उजळावं.सर्व प्राणिमात्रांच्या ज्या ज्या इच्छा असतील त्याही पूर्ण व्हाव्यात."
इथे स्वधर्म म्हणजे प्रथमदर्शनी धार्मिकता, पूजा अर्चा असा भाव आहे असं वाटू शकतं परंतू तो अर्थ माऊलींना अपेक्षित नाही. स्वधर्म म्हणजे जगताना आपल्याकडून अपेक्षित असलेली कर्तव्यं.आपली भूमिका यथास्थित पार पाडणं; आपल्या कामात संपूर्ण निष्ठा असणं याला ते स्वधर्म म्हणतात. कित्येक शतकं उलटली तरी, द्रष्टा असलेल्या, विद्वान असलेल्या व्यक्तीचे विचार कालबाह्य होत नाहीत हे सांगणारा हा विचार... आज तरी काय वेगळं करण्याची गरज आहे, विद्यार्थ्यानं डोळसपणे अभ्यास करावा. मोठ्या माणसांनी वरकमाईची अपेक्षा न ठेवता नेटानं जबाबदारी सांभाळावी. कुणीही स्वच्छतेच्या,संविधानाच्या नियमांना डावलू नये या पेक्षा वेगळा स्वधर्म तो काय!!! आणि मग सर्वच स्वधर्माचं भान ठेवून असतील तर, जे वांछित आहे, इच्छा आहेत त्या सदिच्छाच असणार असाही विश्वास या संतश्रेष्ठाला वाटत असला तर नवल ते काय...
वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी
अनवरत भूमंडळी, भेट तू भूतां ॥४॥
मग माऊली म्हणतात," सतत मांगल्याची पखरण करणारी,परमेश्वराच्या प्रेमाची भक्तीची पालखी वाहणारी मंडळी प्राणिमात्रांना अविरत, अखंड भेटत राहोत."
यावेळी सुद्धा,ईश्वरनिष्ठा म्हणजे कर्मकांड किंवा कुठल्याही चाली-रीती असं त्यांना म्हणायचं नसून, प्रत्येक जीवात परमेश्वराचा अंश पाहणाऱ्या व्यक्ती असाच विचार माऊलींना अभिप्रेत आहे. ही "ईश्वरनिष्ठांची मांदियाळी" म्हणजे नेमकी कोणती माणसं,त्यांचे गुण कोणते, लक्षणं काय... हे सर्व पुढच्या २ ओव्यांमधे स्पष्ट होते.
चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणिचे गाव
बोलते जे अर्णव, पियुषांचे॥५॥
चंद्रमे जे अलांच्छन, मार्तंड जे तापहीन
ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे हो तू॥६॥
या मंडळींचे गुण सांगताना माऊली म्हणतात,"ज्या लोकांचं अस्तित्व म्हणजे जणू कल्पतरूंचं उद्यान आहे,ज्यांच्या चैतन्य जणू सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या चिंतामणीचं वसतीस्थान आहे,ज्यांची वाणी म्हणजे साक्षात् अमृताचा कधीही न संपणारा समुद्र आहे,ज्यांच्या ठायी चंद्राची शितलता आहे परंतु त्यांच्या व्यक्तित्वावर एकही लांच्छन(डाग,कलंक) नाही,जे साक्षात् तेजस्वी सूर्यनारायण आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाने कुणालाही त्रास होत नाही,जे तेजस्वी असूनही बोचरे नाहीत; असे सज्जन सर्वांचे सोयरे असावेत. अशा लोकांचा इतरांना सतत स्नेह मिळावा,साथ मिळावी."
जसं एखाद्या पवित्र वास्तूमधे आपल्याला शांत वाटतं, प्रसन्न वाटतं... तसंच काही व्यक्तींबाबतही होतं.त्यांच्या नुसत्या जवळपास असण्यानेसुद्धा वातावरण चैतन्यमय ,प्रसन्न,सगळ्या चिंता मिटवणारं वाटतं,समाधानी वाटतं. हे लोक बहुतेक वेळा पूर्ण समूहाचं हित स्वार्थाच्या आधी बघतात. अशीच व्यक्तिमत्वं ज्ञानोबारायांना वर्णायची असावीत.
आणि मग या लोकांचा सहवास मिळून ,लोकांमधली सत्कर्माची आवड वाढून पुढे काय घडावं हे माऊली यानंतर सांगतात.
किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिन्ही लोकी
भजिजो आदि पुरुषी, अखंडित॥७॥
माऊली म्हणतात ," सगळीकडे मांगल्याचा वास झाल्यावर या जगातले सर्व प्राणिमात्र सुखी व्हावेत आणि त्यांच्या मनात सतत, आद्य पुरुषाच्या म्हणजे भगवंताच्या भक्तिचा वास असावा. स्वतःची भूमिका बजावत असताना,लोककल्याणाकरिता काही करताना सतत परमेश्वराचं त्यांना स्मरण असावं."
परत एकदा, परमेश्वराची भक्ती म्हणजे दर वेळी जप-जाप्य,होम-हवन,प्रार्थनास्थळाच्या भेटी हे माऊलींना खचितच् अपेक्षित नसणार. आपली रोजची कामं करताना कधिही मनापासून आपल्या श्रद्धास्थानाचं स्मरण करणं असंच् त्यांना म्हणायचं असणार.
आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी ईये
दृष्टादृष्ट विजये, होआवे जी ॥८॥
आता ते शेवटचं दान ईश्वराकडे मागत आहेत,"हा ग्रंथ जो भक्तिने वाचतील,ज्यांच्यासाठी हा ग्रंथ(ज्ञानेश्वरी) विशेष आहे,जे या ग्रंथाची उपासना करतील व त्यानुसार आचरण ठेवतील त्यांना दृष्ट,अदृष्ट यावर विजय मिळावा. भौतिक सुखाबरोबरच त्यांना आत्मिक समाधान लाभावं. त्यांच्या ठायी स्थितप्रज्ञतेची शक्ती असावी."
येथ म्हणे श्रीविश्वेश्वराऒ, आ होईल दानपसाऒ
येणे वरे ज्ञानदेवो सुखिया जाला ॥९॥
आणि सगळं मागणं मागून झाल्यावर जेव्हा ते भगवंताला विचारत आहेत की हे सगळं त्यांनी जे हट्टानं , हक्कानं साकडं घातलं ते पूर्णत्वाला जाईल का, हा वर, हे दान त्यांना मिळेल का; त्यावर त्यांना ईश्वरस्वरूप असणारे त्यांचे गुरू ,त्यांचे थोरले बंधू ’निवृत्तीनाथ’ हे त्यांचं मागणं जरूर पूर्ण होईल असं विश्वासानं सांगतात. गुरू म्हणजे साक्षात् परमेश्वराचीच वाणी या भावनेनं आपण मागितलेलं दान आपल्या पदरात पडणार म्हणून माउली परमसुखाचा अनुभव घेतात....
सर्व जगाच्या हितातंच स्वतःचं परमसुख शोधणारे असे पवित्रात्मे विरळाच्.... माऊली आणि त्यांचे विचार अभ्यासावेत तेवढे दर वेळी वेगळे,जास्त जास्त उदात्त वाटतात. त्यांच्या व्यक्तित्वाची झेप सामन्यांना झेपणं कठीण खरं पण त्यांच्या पाऊलांचा माग घेत पुढे जाणं तर आपल्या हातात आहेच ,नाही का? वाट शोधणे आयुष्यभराचेच पण तूर्तास इतुकेच....
Revision what we learned Sr-KG to 4th std (lifetime learning)
ReplyDeletetrue.... it's life time learning
DeleteA neutral approach, and hence more believable.
ReplyDelete