बरोबर... अगदी बरोबर अंदाज आहे. झी टि व्ही, मराठीच्या प्रेक्षकांना लगेच "अवधूत आणि त्याचा खुपते तिथे गुप्ते" आठवला असणार शिर्षक वाचून.काय मस्त कल्पना आहे ना...असा कॉल लावायचा की आपल्याला पहिजे त्या व्यक्तिशी बिनदिक्कत बोलता येईल..मग जगात ,जगाबहेर कुणीही, कुठेही, कसंही असो,कॉल लागणारच... मला कधी असं कुणाला कॉल लावता आला तर....कुणाला बरं फोन लावेन मी...एक ना दोन हजार नावं डोक्यात यायला लागली विचारासरशी.तर आता ना मी अशी कल्पना करणार आहे की खरंच मला ती शक्ती मिळाली आहे आणि फोन लावणार आहे... सहज् प्रश्न येईल कि हजार नावं आली डोक्यात त्यातल्या नेमक्या कुणाला??? अवधूत १च फोन करु देतो पण आता हा माझा आहे ना मॅजिक कॉल... मग मी १० कॉल करण्याचं स्वातंत्र्य घेतलंय :)
कॉल लावणार अशा लोकांना, ज्यांना मी अवघ्या आयुष्यात बघू तरी शकेन की नाही कल्पना नाही. ज्यांनी माझं एवढसं आयुष्य भरून टाकलयं. असे लोक ज्यांना माझ्या साध्या फोनवरून मी कधी साद द्यावी अशी सुतराम शक्यता नाही.... आणि कदाचित् नाई... नक्किच हे फोन चढत्या क्रमाने लागतील, म्हणजे शेवटचा कॉल सगळ्यात महत्वाचा.....आणि सगळ्यांकडे काहीतरी मागायलाच करणार आहे मी हे उपद्व्याप...
कॉल १:
हॅलो...नमस्कार संजीवजी.तुमच्या गाण्याबद्दल मी तुम्हालाच काय सांगू! आणि मला गाणं अजिबात येत नाही हे तरी कशाला मुद्दाम सांगू म्हणा!!! पण तुमचं गाणं ऐकलं ना की सगळं जग शुद्ध आणि पवित्र वाटायला लागतं..अगदी पंढरीच्या त्या सावळ्या पावलांसारखं...मध, रेशीम,मोती सगळं एकत्र केलं आणि त्याचा जिवंत झराच बनला तर जसा सुरेख बनेल तसं वाटतं तुमचा आवाज ऐकुन. मला कल्पना आहे की अशी गती मला येणे नाही गाण्यात, पण तरीही बाकायदा तुमची शिष्या बनून तुमच्याकडून तुमच्यासारखा पवित्र षड्ज् लावायला शिकायचंय मला. शिकवाल? प्लीज!!!!!!!!!!!!
कॉल २:
अतुल मी नाई, तूच बोलत रहा.तुझा आवाज ऐकता येत असताना स्वतःचा काय ऐकायचा!! आं... हो हो, खरचं कॉल मी केलाय म्हणल्यावर त्याचं प्रयोजनही मीच सांगितलं पाहिजे....मला ना खूप आवडतोस् तू... प्रेमात आहे मी तुझ्या...किती म्हणजे किती जास्त गुण एकाच माणसाला मिळावेत ना...गणितं मांडताच येत नाहीत तुझ्याबाबत...म्हणजे अतुल कुलकर्णी...नायक म्हणून तर तुला काही सीमा असतील अस मला वाटतचं नाही.... अमेय आहेस तू त्याबाबतीत... पण त्याहीपेक्षा तुझी प्रगल्भता.तुझ्या मुलाखतींमधून तुझ्यातला कणखर तरिहि संवेदनशील,सामाजिक भान असणारा उमदा माणूस तितकाच कदाचित् काकणभर जास्तच् भावलाय मला... तुझं सगळं लिखाण संग्रही ठेवायची खूप आस आहे.मला देशिल वाचायला... निदान ती कविता तरी...
"आज मैने सिग्नल तोडा, एक गोली मेरी थी,
आज मैने रिश्वत ली एक गोली मेरी थी"
देशिल प्लीज?????????????????????????
कॉल ३:
हॅ...हॅलो.... सॉरी सचिन, अरे पण तुझा आवाज ऐकला आणि बोलतिच बंद झाली माझी. तू खरंच सचिनच बोलतोयस ना.कळतयं तसं आणि तेव्हापासून तुझ्याशी बोलता यावं, तुला भेटता यावं अशी स्वप्नं बघत मोठी झाली आमची अख्खी पिढी.आम्ही ब्रॅडमन ते गावस्कर कुणालाच पहिलं नाही... आम्ही तुला पहातच मोठे झालो रे. तुझ्या चौकारांसरशी आजीची अभ्यासासाठी बोलणीही खाल्ली.तुला आऊट करणारा गोलंदाज सैतान वाटलाय आम्हाला कायम.तुझं फ़क्त खेळाडूपणच नाही तर खूप चांगला माणूस असणं (म्हणजे ऐकुन आणि वाचून) खूप भावलयं आम्हाला कायम.क्रिकेट म्हणजे तू आणि तूच हे समिकरण तू निवृत्त झालास तरी जात नाही डोक्यातून. मी आणि माझ्या छोट्या भावाने तुझ्यावर ना कविता लिहिल्या आहेत २.तुला भेटून ऐकवायची आणि भेट द्यायची इच्छा आहे जबरदस्त.... एकदा निवांत भेटशील, फक्त एकदाच?
कॉल ४:
आशा ताई... तुम्हाला..तुला...नाई तुम्हालाच ठीक आहे....तुम्ही हसताय पण असंच होतं. तुमचं गाणं कारणीभूत आहे याला... कसं म्हणजे काय,असं गाता की क्षणात ए आशा ताई म्हणावसं वाटेल.आणि जरा गुणगुणावं म्हणलं की मग कळतेच पायरी स्वतःची.. मग आपोआप अहो आशा ताई असंच येतं तोंडात. तुमचं गाणं ऐकलं की राशिद साहेबांचा शेर खऱ्या अर्थाने कळतो... ते असं म्हणतात...
"उसकी पुर्बत मे अजब दूरी है
आदमी होके खुदा लगता है"
असं आहे तुझं गाणं... खूप आपलंसं तरी खूप जास्त उंचीवरचं , खूप मधाळ तरी उसाच्या पात्यासारखं धारधार... तुझ्या गाण्यातूनच तर शिकलेय मी भावना म्हणजे काय!!! येणार नाथ आता म्हणणारी सुवासिनी, तरुण आहे मधली शोकिनी, एक फुलले फूल मधली विरहिणी, का रे अबोला मधली कामिनी... जाऊ दे यादी एवढी आहे...मी काय सगळं मांडणार... पायीची वहाण पायी बरी हेच् खरं... तरी एकदा तुझा रियाज ऐकायचाय मला...मी येऊ का गं? चालेल तुला?
कॉल ५:
अरे, बरोब्बर लागलं की एक्सटेंशन... तुम्ही सरस्वतीच्या मंदिरातच् स्थायिक असणार याची खात्रीच होती मला व.पु. पु.ल. पण असतील ना तिथेच तुमच्यासोबत... हो ना हो.. त्यांच्याशी बोलायची आस कुणाला सुटलीये... पण कॉल मर्यादित आहेत ना... त्यांच्याशी मी शाळकरी मुलगी असताना का होईना ओझरतं बोललेय हो... म्हणून तुमच्याशी बोलायचा चान्स घेतला आधी...
हो बरोबर तुम्ही रोजच् बोलता आमच्याशी कथांमधून... माझा फोन आज लागला... तुमच्यासारखा माणूस टिपणं जमेल मला? निखळ हास्य देण्याची ताकद माझ्या शब्दांना येईल? तुमच्यासारखं हसता हसवता अंतर्मुख करण्याइतकी माझ्या विचारांची बैठक तयार होईल? तुम्ही तिथेच आहात... माझ्यासाठी जरा जॅक लावा की सरस्वती मातेकडे... एवढं दान द्या.. मग मला लता सारखा सूरही सापडेल आणि लॉरेल हार्डी सारखं हसता ही येईल... एवढंही जमलं नाही तर तुमच्या हसऱ्या दुःखाची पारायणं करून फायदा काय ना? ;)
कॉल ६:
हॅलो.... गुरुवर्य चाणक्य का? मी? मी आहे आपली अशीच एक नागरिक या भरतखंडातली...खरं सांगू का? तुम्ही एवढं ऐश्वर्य ठेवून गेलात मागे पण झोळीच फाटकी घेऊन जन्म झाला गुरुजी... तुमची ओंजळ तुम्ही रिती कराल हो पण इथे हजार भोकं पडलियेत,काय राहणार या झोळीत? तुमच्या राजकारणातला, मुत्सद्दीपणातला,दूरदृष्टीतला थोडासा वसा घेऊन एखादा राजकारणी जन्माला य़ेईल असं काहीतरी सेटिंग लावा ना..
.तुमच्या वरदहस्ताची खरंच नितांत गरज आहे हो माझ्या भारतभूमीला... तुमच्यासारखं तेजाचं साक्षात् दर्शन घडवणारी मुर्ती याची देही याची डोळा पहायला मिळेल? सरकारी काम समजून वाटल्यास सरकारी समई वापरून असं एखादं प्रपोजल वैकुंठी मांडा... तुमचं ऐकतील हो भगवंत....
कॉल ७:
मुजरा महाराज... तुमचा आवाज ऐकला आणि धन्य झालं आयुष्य. एक अर्जी आहे महाराज,जरा लाऊड स्पीकरवर टाकता का फोन? मला खात्री आहे कि स्वामीजी,तात्याराव सावरकर, लोकमान्य, भगतसिंग,राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई, थोरले पेशवे सरकार सगळे सगळे आपला सहवास सोडत नसणार... म्हणजे मी सगळ्यांशी नाही बोलू शकले तरी माझं गाऱ्हाणं आपण सगळे ऐकाल आणि सगळ्यांची पुण्याई माझ्या पाठी उभी राहील...हां टाकलात ना स्पीकरवर... आभारी आहे राजे...
महाराज, तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक अंश दान म्हणून पदरात टाकाल? स्वप्नं बघण्याची तुमची झेप, आपलं स्वप्नं आपल्या भरकटलेल्या प्रजेमधे रुजवण्याची अफाट ताकद, कुठल्याही कामाला वाहून घेण्याची वृत्ती, सगळ्या संकटांना पार करण्याचं धैर्य आणि सुराज्य स्थापनेची तुमची कळकळ याचा १ अंश माझ्या पिढीला आशिर्वाद म्हणून द्याल? आपल्या मातृभुमीला आपल्यासारख्या अपत्यांची गरज आहे... तुमच्यातला द्रष्टा थोडा माझ्यात जागवाल?
कॉल ८:
अर्धी रिंग पण नाई वाजली. सगळ्यात लवकर तुम्हीच उचललात कॉल माझा... हां? काय? खरंच.. उगीच नाही माऊली म्हणत तुम्हाला अवघा महाराष्ट्र!!! माऊली लेकराला ताटकळत कसं ठेवेल!!! तुम्ही भगवंतांची दुर्बोध गीता... मायमराठीत आम्हां पामरांसाठी रेशीमधाग्यासारखी तरल, सरल केलीत... तरी आम्ही करंटे अजून कोरडे ते कोरडेच...
तुमचा ९००० ओव्यांचा वाग्यज्ञ रुजावा इतकी सुपिक जमीन नाई मी... पण माऊली...पसायदानाच्या ९ ओव्या रुजतील का हो माझ्यात?अगदी परवा परवाच एका मित्राला अर्थ सांगत होते मी पसायदानाचा.. पण मी जगू शकेन कधी ते अमृत? माऊली, जगासाठी ओसंडणाऱ्या तुमच्या डोळ्यांमधला १ थेंब हवाय माझ्या डोळ्यात... द्याल? तोच थेंब मग भक्ती,क्षमा, दया, शांती, अगदी आपलं वाईट चिंतणाऱ्याचंही चांगलं चिंतण्याचं पावित्र्य आणि निरागसता सगळं सगळं देईल... तेवढं पाणी द्याल माझ्या डोळ्यात? लेकराला रिक्तहस्त ठेवणार नाही तुम्ही, माहिते मला... विठूरायानं तुम्हाला चॉईस कुठे ठेवलाय तो?
कॉल ९:
ए... आपण कित्ती वेळा बोललोय न नेहमीच्या भेटायच्या जागी आपल्या! ए तुला कॉल करण्यात एवढं भारी वाटेल असा विचारच नाही केला मी... हो रे बाबा.. मी काई तुला भेटणं थांबवणार नाईये कॉलची सोय झाली तरी... तू दोस्त आहेस ना माझा एकदम जिवलग... मग तुला न भेटून कसं निभणार...
हे बघ बाप्पा, तुझं काम अगदी सोपय... मी सगळ्यांना कॉल करून जे मगितलय ना ते त्यांच्याकडून घडवून आणायची जबाबदारी तुझी... हो तुला मी विनंती नाहीच करणार... तुला नाई हक्कानं मागायचं तर कुणाला? बाकी भेटूच.. मी धडकेनच आपल्या कट्ट्यावर... चल.. शेवटचा फोन करायचाय.ठेवते हां...
कॉल १०:
हाय...कशी आहेस? आपलं छान आहे नाई.. मी तासभर बोलले तुझ्याशी तरी कुण्णाला कळणार नाई की कुणाशी बोलतेय मी... आपण असेच राहणार नाई नेहमी...मी जगासमोर तू आपली फ़क्त माझ्यासमोर ...ती सुद्धा अगदी रोज नाई... तुला असं माझ्यासारखं होत नाही का गं? कशी अशी कोशात राहतेस कायम?
पण माझ्याशी बोलत जा हं... तुझ्याशी संवाद नसेल तर सगळं व्यर्थ आहे राणी... तू आहेस म्हणून जे काही थोडं चांगलं करायची ताकद आहे ती आहे.. माझी कविता सुद्धा तुझ्यामुळे, कल्पनाशक्ती पण, समाजासाठी धडपडणं पण तुझंच् आणि प्रेम करण्याची शक्ती तर साक्षात तूच... माझं असं माझ्यात काही चांगल नाही गं.. तू आहेस म्हणून जीवात जनावर नांदत नाई.. माणूसपण नांदतय... तुझं वारंवार भेटणं ही माझी गरज आहे ग बाई... तुला लोक काहीही म्हणोत... मानसी, मॅडी,आश्ना,कविता, माऊ,मनू...काहीही... कुठल्याही नावानं भेट पण भेटत रहा गो... बोलत रहा माझ्याशी... ऐकशील ना एवढं आयुष्यभर?
magic call wala phone mala pan...
ReplyDeletedecide the recipients of your call and we will get the phone for u :)
ReplyDeleteWaa... Mast!!!
ReplyDelete:)