महाभारत म्हणलं की आठवतं ते कुरूक्षेत्र...महाभारत म्हणजे युद्ध, महाभारत म्हणजे कलह! एखाद्याचं कडाक्याचं भांडण झालंकी देखील त्याची तीव्रता मांडताना आपण ’महाभारत झालं’ असं म्हणतो.परंतु तरीही, महाभारत... भारतीय संस्कृतीमधे उच्चतम् प्रतिचं मानलं जाणारं शिल्प. खरं खोटं देव जाणो,पण व्यास महर्षिंच्या प्रतिभेतून जो गंगौघ अवतरला तो युगानुयुगं भारतीय ( आणि आता पश्चात्यही) मनात वाहतो आहे. अर्थात त्याचं कारण महाभारताची जुजबी माहिती असणाऱ्या व्यक्तिलाही सहज लक्षात येईल.व्यास महर्षिंनी मानवी मनाच्या,भावनांच्या आणि स्वभावाच्या इतक्या संकल्पना ह्या निर्मितीत अजरामर केल्या की आज लाखो वर्षांनंतरही त्या सर्व छटा सहज अनुभवता येऊ शकतात. किंबहुना आज आढळणाऱ्या कोणत्याच वृत्ती त्या काळातही व्यासांकडून निसटल्या नाहीत. आजही अवतीभवती त्याच व्यक्तीरेखांची प्रतिबिंब सहजगत्या दिसत राहतात.म्हणूनच ’व्यासोच्छिष्टं जगत् सर्वं’ असं जाणते म्हणतात.
स्वभावाचे अनेक पैलू दाखवणारे कौरव पांडव तर ह्यात आहेतच. पण त्याशिवाय आपल्या कुळाचा उत्कर्ष आणि क्षय सहन करणारी सत्यवती आहे. ’बाह्यरुपापेक्षाही अंतर्मुख करणारं दु:ख दे’ असं दान देवाकडे मागणारी माता कुंती आहे तर दुसरीकडे पतीच्या मृत्यूचं निमित्त बनणारी माद्रीसुद्धा आहे. नव~याच्या सुखात सुख शोधणारी आणि त्याच्याच वाटेवर चालायचं म्हणून असलेली शक्ती त्यागून अंधत्व स्विकारणारी महापतिव्रता देवी गांधारी आहे.दातृत्वची मुर्ती असलेला कर्णराज आहे. निष्ठेची आणि भक्तीचं असीम दर्शन घडवणारा पण काहीसा दुर्लक्षित महावीर एकलव्य आहे. जीवनापेक्षाही उदात्त असे पितामह भीष्म आहेत.अत्यंत तेजस्वी परंतु तितकेच लाचार,’अर्थस्य पुरुषो दास:’ ही उक्ती ज्यांच्याकडे पाहून पटावी असे द्रोणाचार्य आहेत. ब्राह्मण्य आणि क्षत्रियत्व ह्या दोन्ही शिखरांवर एकाच वेळी चढू पाहणारा आणि कुठेच न पोचणारा त्रिशंकू अश्वत्थामा आहे.सद्सदविवेकबुद्धीचं मुर्तरूप,महाज्ञानी विदुर आहेत.कुरुवंशाशी नातं असूनही सूत म्हणवून घेणारे महाराज अधिरथ आहेत. आणि आहे दैवी अस्तित्व असलेला द्वारकाधीश कृष्ण.
कृष्ण.... तो खरोखर दैवी!!! विचारातही कुणी झेपावू शकणार नाही,इतकी रुपं कृष्णानं साकारली.प्रत्येक व्यक्तिरेखा एका स्वभावाचं प्रतिक मानली जात असतानाच कृष्णत्व म्हणजे पुर्णत्व मानलं गेलं.त्याचं कारण कदाचित त्याच्या अगणित रुपांमधे मिळेल.प्रत्येकाला तो वेगळ्या रुपात मोहक वाटला.प्रत्येकजण त्याच्या आगळ्या वेगळ्या पैलुकरता त्याला मानत आला. किती रुपं उलगडणार त्याची!!!
कुणाला तो अल्लड बाळकृष्ण म्हणून मोहून टाकतो.कुणाला तो माखनचोर म्हणून खुणावतो. कंसाच्या तमाम शक्तिंना पाणी पाजणारा बालवीर म्हणून त्याच्याबद्दल आदरभाव निर्माण होत असेल तर गोकुळाचा आणि गोपिंचा कंठमणी म्हणून त्याच्याबद्दलच्या प्रेमानं कुणाचं हदय भरून जात असेल.कुणाला तो शिष्योत्तम म्हणून आवडत असेल तर कुणाला त्याचं मैत्र अभूतपूर्व वाटत असेल. १६ सहस्त्र स्त्रियांना कलंकविरहीत करण्यासाठी त्यांना आसरा देणारा समजोद्धारक असो किंवा निष्काम कर्मयोगाचा गीतोपदेश करणारा गुरू... तो पूज्यच आहे. राधेयाला ’युगंध’ बनण्याचा वर देऊन त्याच्या निष्ठेचा उचित सन्मान करणाऱ्या कृष्णाला पक्षपाती कसं म्हणावं! एकलव्यासारख्या वीराची कीर्ती निष्कलंक रहावी म्हणून स्वत: पापाचा धनी होणारा,शस्त्र न उचलण्याची प्रतिज्ञा मोडणारा कृष्ण कदाचित कुणाला धूर्त किंवा कपटी वाटेलही पण दुसऱ्यासाठी सर्वस्व,स्वत:चं शील कलंकित करायलाही न डगमगणारी मुर्ती त्याच्या अर्पणभावाची झलक देऊन जाते. परंतु इतक्या अनंत पैलूंनंतरही त्याचा एक सुरेख स्वभाव जगाकडून थोडा दुर्लक्षित आहे.ह्या सगळ्या रुपांपेक्षाही मोहक,आदरणीय,स्तुत्य आणि प्रेमळ असं त्याचं रुप... सखीमित्राचं!!!
सखी... द्रौपदी... तिचा हा मित्र;म्हणून तो सखीमित्र.तसा नात्यानं तो तिचा दीर,ज्यानं इहलोकीच्या प्रवासात प्रत्येक क्षणी तिची साथ दिली.’गुरू-बंधू-सखा-त्राता’अशा अनेक रुपात तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणारा तिचा सखीमित्र.ती राजकुमारी असो,सम्राज्ञी असो वा वनवासिनी स्त्री;तो आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,प्रत्येक चांगल्या वाईट परिस्थितीत तिच्याबरोबर आहे.
अर्जुनावर भाळलेल्या द्रौपदीबरोबर तो अवखळपणाचा आव आणत थट्टा मस्करीत रममाण होतो. राजसुय यज्ञासारख्या मंगल प्रसंगी विनाकारण कर्णराजाचा अपमान करणाऱ्या राज्ञीसमोर तो कठोर टीकाकार म्हणून उभा राहतो. वनवासात अनपेक्षितरित्या उभ्या ठाकलेल्या अतिथिंच्या आदरसत्काराची व्यवस्था करून तो तिला अन्नपुर्णेचा मान मिळवून देतो.कुरूश्रेष्ठांसमोर तिची विटंबना करू धजलेले हात न पाहवून जो फक्त त्याच्या अस्स्तित्वाने तिची लाज राखतो तो कृष्ण आणि ती त्याची ’कृष्णा’. गरोदरपणातच तिच्यावर आणि तिच्या लेकरावर युद्धनितीचे संस्कार करणारा गुरूही तिचा सखीमित्रच आणि तिच्या सौभाग्याच्या रक्षणासाठी हाती सारथ्य घेणाराही. कुरूक्षेत्रावरच्या अपरिमित नाशानंतर तिचं सांत्वन करणाराही तोच आणि त्यानंतर तिच्यावर छत्रछामरं ढाळणाराही. तो राखी बांधून घेत नाही तरी तिच्या सर्वस्वाचं रक्षण करतो. गुरूदक्षिणा न घेता ज्ञानाची आणि धैर्याची दीक्षा देत राहतो. तो तिचा पिता नाही तरी माहेरची सुखं तिच्या पुढ्यात ठेवतो आणि पती नाही तरी सतत तिची साथ देतो.तो तिचा मित्र आहे... बस् एवढ्याचसाठी. तिची भक्ती,तिचा विश्वास,तिचा आदर आणि तिचं निरागस प्रेम समजू शकणारा तिचा मित्र.अंधारात ज्योत बनणारा आणि उन्हात सावली होणारा; तिच्या दु:खाचे डोह अलगद शांत करणारा आणि तिच्या आनंदात समुद्रासारखा उधाणणारा...
स्पर्शाच्या पलिकडलं,नावाच्या शिक्कामोर्तबाची मुखत्यारी नसणारं,फक्त नजरेतून,अस्तित्वातून तिला शक्ती देणारं हे नातं.ह्याच नात्याची का बरं मलातरी आठवण यावी? कदाचित त्या सखीमित्राचीच इच्छा... अख्खं महाभारत मुखोद्गत करणारे आपण कदाचित हे पावित्र्य विसरून गेलोय आणि त्याचीच स्मृती द्यावी म्हणून त्या पुरुषोत्तमानं ही चेतना जागवली असेल.
खरंच एकदा विचार करूया की अशी एक द्रौपदी आणि असा एक कृष्ण...अंशरुपानं आपल्यातही आहे. कुणासाठी आपण सखी असू तर कुणासाठी सखीमित्र. कुणी आपला आधार बनत असेल तर कुणासाठी आपण दीपस्तंभ आहोत.हे वाचत असताना तुमच्या अशाच एखाद्या पवित्र नात्याची सर क्षणात मनात बरसली असेल. पण मग तरीही हे पवित्र मैत्र आजुबाजूला कलंकित होताना का दिसत असेल? का ह्या पावित्र्यावर लोकांचा विश्वास बसत नसेल?
कारण आहे... कारणाशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. आपण सखी आणि सखीमित्राचा अंश आपल्यात तेवता ठेवत असूही,पण आपल्यातला पांडवांचा आणि रुक्मिणीचा अंश आपण जपतोय का? पांडव आणि रुक्मिणीच्या अभेद्य विश्वासाशिवाय सखीमित्राचं त्याच्या सखीशी असलेलं नातं इतकं सुरेख आणि दृष्ट लागण्यासारखं असणं शक्य तरी आहे का? कुठलीच सखी रुक्मिणी व्हायची इच्छा बाळगत नाही आणि कुठल्याच कृष्णाला पांडवांच्या स्थानाची भूल पडत नाही हे आपल्यातल्या रुक्मिणीला आणि पांडवांना खरंच कळतय का?आपल्याच अर्धांगावर आपली तितकी श्रद्धा आहे का?
राधेचा कान्हा,मीरेचा मोहन,गोपिंचा कन्हैया आणि सखीचा सखीमित्र असला तरी तो रमारमण फक्त रुक्मिणीचाच आहे याचा विश्वास आजही रुक्मिणीला आहे का? भक्ती आणि त्यातून मिळणाऱ्या शक्तिशिवाय कृष्णाकडून काही नको हे सत्य जाणण्याइतका विवेक पांडव आज जपतात का?
सगळे व्याप बाजूला ठेवून काही क्षण शांत बसू.जितकं सखी आणि सखीमित्र होणं सोपं तितकंच पांडव आणि रुक्मिणी होणंही.फक्त त्यासाठी हवं धैर्य,प्रेम,आदर,सुजाणपणा आणि गाढ नि डोळस विश्वास.आपल्याला हे जमेल का? ’कृष्णार्पणमस्तु’ म्हणत एक प्रामाणिक प्रयत्न तर करू. कदाचित आपलीच रुक्मिणी मग जपत राहील आपल्यातल्या सखीमित्र!
No comments:
Post a Comment